जळगावचे खासदार उन्मेष पाटील अडचणीत!; फसवणूकप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये तक्रार दाखल

 - कंपनी हस्तांतरित करण्यासाठी दमदाटी, शिविगाळ केल्याचा, तसेच कोट्यवधी रूपये हडपल्याचा आरोप !


- पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल नाही; फिर्यादी कोर्टात जाण्याची शक्यता !


छत्रपती संभाजीनगर (खास प्रतिनिधी) - ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील हे अडचणीत आले आहेत. त्यांच्यासह त्यांचे मेव्हणे प्रशांत राजेंद्र वाघ, सनदी लेखापरीक्षक (सीए) प्रमोद नरहरी जाधव (पुणे) व रामेश्वर भानुसे यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्यादी तथा उद्योगपती संजय मोहनराव सिनगारे (वय ५०) रा. पाणीवेस, जालना यांनी लेखी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी हा तक्रारअर्ज तूर्त चौकशीवर ठेवला आहे. गुन्हा जेथे घडला असेल, त्या पोलिस ठाण्याकडे हा अर्ज वर्ग केला जाणार आहे. पोलिसांनी वेळेत गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही तर फिर्यादी हे न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे.


प्रसिद्ध उद्योजक तथा फिर्यादी संजय सिनगारे यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत अनेक गंभीर बाबींचा उहापोह आहे. प्रामुख्याने त्यात नमूद आहे, की खासदार उन्मेष पाटील, त्यांचे मेव्हणे प्रशांत वाघ, सीए जाधव व त्यांचे मावसभाऊ रामेश्वर भानुसे यांनी सिनगारे बंधुंनी बोली लावून विकत घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील श्रीनिवासा प्रोटीन प्रा. लि. (पूर्वीची रसोया प्रोटीन प्रा. लि.) या कंपनीत गोड बोलून व विविध आश्वासने देऊन संचालक म्हणून प्रवेश मिळवला. तसेच, कंपनीच्या खात्यातून बळजबरीने हातउसणवारीच्या नावाखाली वेळोवेळी ३.५० कोटी रूपये हे सीए जाधव यांच्या वडिलांच्या नरहरी जाधव यांच्या खात्यात वर्ग करून घेतले. तसेच, या कंपनीचे कर्ज मंजूर होण्यापूर्वी व युनीट चालू करण्याकरिता लागलेला खर्च १०.५० कोटी रूपये हा आम्ही नंतर तुम्हाला देऊ, असे सांगून करवून घेतला. परंतु, पैसे मागितले असता देणार नाही, असे सांगून काय करायचे ते करा, असे धमकावले व ईडी, सीबीआय मागे लावायची धमकी देऊन पैसे देण्यास टाळाटाळ चालवली आहे.


एवढेच नाही तर वेळोवेळी तीन कोटी रूपयांची रक्कम खासदार साहेबांना लागते आहे, असे सांगून कंपनीतून काढून घेतली. या पैशाचीही मागणी केली असता, सिनगारे बंधुंसह संचालकांना धमक्या देऊन दमदाटी केली व पैसे दिले नाहीत. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून कंपनीच्या संचालक पदाच्या कोर्‍या राजीनामापत्रावर सह्या देण्यास धमकावले, कंपनीतील शेअर्स रक्कम २० कोटी रूपये मला रोख स्वरूपात द्या, मी ती तुम्हाला फिरवून देतो, म्हणजे तुमचा व कंपनीचा काही संबंध राहणार नाही, असे बजावले. तसेच, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय विश्रामगृहावर शिविगाळ, दमदाटी करून धमक्या दिल्यात, अशा आशयाचा तक्रारअर्ज संजय मोहनराव सिनगारे यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल केलेला आहे. काल, दि.२ मार्चरोजी पोलिसांनी हा तक्रारअर्ज दाखल करून घेतला असून, अद्याप खासदार उन्मेष पाटील व इतरांविरोधात गुन्हे दाखल केले नव्हते. या अर्जातील गुन्हा घडल्याचे घटनास्थळ आपल्या पोलिस ठाणेहद्दीतील नाही. अर्ज काळजीपूर्वक वाचून तो संबंधित पोलिस ठाण्याकडे पाठवून देऊ, असे बेगपुराच्या ठाणेदार आम्रपाली तायडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, खासदार उन्मेष पाटील यांच्याशी त्यांची बाजू ऐकण्याकरिता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

---------

या संदर्भात बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या ठाणेदार आम्रपाली तायडे यांच्याशी संपर्क साधला असता, संजय सिनगारे यांचा तक्रारअर्ज काल प्राप्त झाला असून, आमच्या पोलिस ठाणेहद्दीत काही वाद झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, फसवणुकीचा प्रकार (fraud) हा आमच्या ठाणेहद्दीत घडलेला नसल्याने संबंधित अर्ज काळजीपूर्वक वाचून, ज्या पोलिस ठाणेहद्दीतील हा प्रकार असेल, त्या पोलिस ठाण्याकडे आम्ही हा अर्ज पाठवून देऊ, अशी माहिती पीआय तायडे यांनी दिली आहे.

----

फिर्यादी उद्योजक संजय मोहनराव सिनगारे यांची मूळ फिर्याद वाचा जशीच्या तशी -

---------

Post a Comment

Previous Post Next Post