आयारामांची गर्दी तुतारीला महागात पडणार ?

आयारांना तिकीट वाटून पवारांनी 'निष्ठे'चं नरेटिव्ह कमजोर केलंय ?



राष्ट्रवादीत झालेल्या बंडाळीनंतर पवारांवर पक्षाचं अस्तित्त्व टिकवण्याची वेळ आलीये. यंदाची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी निर्णायक ठरणारंय. पवारांचे समर्थक नेहमीच पवारांना नेता घडवणारं विद्यापीठ अशा आशयानं संबोधतात. तर राज ठाकरेंसारखे विरोधक दुसरं नरेटीव्ह मांडतात. 'राष्ट्रवादी हा पक्ष निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी आहे.' असं विधान राज ठाकरेंनी भरसभेत केलं होतं. राज ठाकरेंच्या या विधानाची पुन्हा आठवण केली जातीये. निमित्त ठरतंय पवारांच्या पक्षात सुरु असलेलं जबरदस्त इनकमिंग. मविआ जागा वाटपात पवारांनी १० जागा पदरात पाडून घेतल्यात. राष्ट्रवादीत बडे नेते अजित दादांसोबत गेले. मागे राहिलेल्या युवा फळीला संधी मिळेल, पवार नवे नेते घडवतील अशी चर्चा होती. मात्र पवारांनी आयारामांना संधी दिली आहे. पवारांची ही चाल त्यांच्यावरच बुमरँग ही होवू शकते. पवार गटात दाखल होवून राजकीय भविष्य शोधू पाहणारे नेते कोण आहेत? त्यांचा कसा फटका पवारांना बसु शकतो? हे पाहणं महत्त्वाचं आहे.


धैर्यशील मोहिते पाटील


भाजपला सोडचिठ्ठी देत धैर्यशील मोहिते पाटलांनी हाती तुतारी घेतली. माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी त्यांनी हा निर्णय घेतला. भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट मिळालंय. निंबाळकरांच्या उमेदवारीवर पहिल्यापासुन मोहितेंची नाराजी होती. निंबाळकरांचं तिकीट कापून आपल्याला संधी मिळेल याची खात्री मोहितेंना होती. मात्र, तसं घडलं नाही. म्हणून मोहितेंनी हाती तुतारी घेतली. पवारांच्या राष्ट्रवादीत अभिजित जगतापांसारखे तगडे नेते आहेत. शिवाय संभाजी ब्रिगडचे प्रवीण गायकवाड मुळ माढ्याचेच आहेत. पुण्यात व्यावसायिक असले तरी गायकवाडांचा मोठा संबंध माढ्यात आहे. अशा तगड्या उमेदवारांची यादी असतानाही पवारांनी मोहितेंना तिकीट दिलं. त्यामुळं निष्ठावंतांना पवारांकडून न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण होते आहे. धैर्यशील मोहितेंच्या विरोधात प्रचार करण्याची भूमिका पवार गटाचे स्थानिक कार्यकर्ते घेवू शकतात. अशी चर्चा दबक्या आवाजात सुरुये. 


निलेश लंके


नगर दक्षिणची जागा लढवण्यासाठी निलेश लंकेंना पवारांनी संधी दिली. राष्ट्रवादीच्या बंडानंतर निलेश लंके अजित दादांसोबत होते. दादांची साथ सोडून ते पवारांकडे आलेत. लंकेंची खासदार होण्याची महत्त्वकांक्षा मोठी आहे. गेल्या वर्ष दिड वर्षांपासून ते विखेंना आव्हान देत आहेत. अशा परिस्थिती विखेंची विकेट पाडण्यासाठी लंकेंनी कंबर कसलीये. पवारांनीही याच लंकेंवर सट्टा लावला आहे. हे करताना पवारांकडून स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. लंकेचा प्रवास हा शिवसेना ते राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी अजित दादा गट ते शरद पवार असा राहिलेला आहे. लंके ब्रँड ऑफ पॉलिटिक्स राष्ट्रवादीच्या खासकरुन पवार स्टाईल ऑफ पॉलिटिक्ससोबत जाणारी नाही. तरी लंकेंना उमेदवारी मिळाली आहे. लंकेंचा राजकीय पक्षांचा प्रवास निवडणूकीवर परिणाम पाडू शकतो. शिवाय निष्ठेवर टिका करताना लंकेंना प्रति टिकेचा सामना करावा लागेल. प्रभावी नरेटिव्ह उभारण्यात लंके अपयशी ठरले तर नगर दक्षिणची जागा पवार गटाला गमवावी लागेल. 


बजरंग सोनवणे 


निलेश लंकेंप्रमाणं बजरंग सोनावणेंचंही पवारांना ग्रँड वेलकम केलं. बीडची जागा त्यांना दिली. गेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा दणकुण पराभव झाला होता. तेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती. फाटाफुट नव्हती. आता मात्र राष्ट्रवादीत दोन गट आहेत. अशात बीडची जागा पवारांना आली. धनजंय मुंडेंसोबत दादा गटात गेलेल्या नेत्याला पवारांनी उमेदवारी दिली. यामुळं बीड राष्ट्रवादीत मोठी नाराजी असल्याचं बोललं जातंय. बजरंग सोनावणेंनी दादांची साथ सोडून तुतारी हातात घेतली. बीडला राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. आमदार संदिप क्षीरसागरांसारखे नेते त्यांच्याकडे सुरुवातीपासून आहेत. अजित दादांच्या फुटीनंतर त्यांनी पवारांना चांगलीच साथ दिली होती. असं असतानाही बऱ्याच निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आलं. निवडणूकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या नेत्यांना तिकीट मिळालंय. 


अमर काळे 


वर्ध्या जागा पवारांनी आपल्याकडे घेतली. काँग्रेसच्या माजी आमदारांच्या हाती त्यांनी तुतारी दिली. अमर काळेंना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश मिळाला. लागलीच वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. अमर काळे यांचे वडील शरद काळे हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. शरद काळे हे काँग्रेसकडून आमदार होते. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव अमर काळे कॉंग्रेसचे आमदार झाले. अमर काळेंना यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यानं स्थानिक निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना आहे. 


श्रीराम पाटील


भाजपमधून उमेदवार आयात करत पवारांनी सर्वांना मोठा धक्का दिला. श्रीराम पाटील यांनी फेब्रुवारीमध्ये चंद्रशेखर वावनकुळेंच्या उपस्थित भाजपवासी झाले होते. श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघ लढण्याची महत्त्वाकांक्षा होती. मात्र, ही जागा भाजपने रक्षा खडसेंना दिली. आपली संधी गेली हे श्रीराम पाटलांनी लक्षात घेतलं. एका रात्रीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. लगेचच त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली. एकनाथ खडसेंनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीला रामराम ठोकला. मधल्या काळात खडसेंना मोठा विरोध स्थानकि पातळ्यांवर राष्ट्रवादीकडून सहन करावा लागला. विस्कटलेली कार्यकर्त्यांची घडी सावरण्यात पवारांनी वेळ घालवला नाही. थेट आयारामाला संधी दिलीये. 


सुरेश म्हात्रे 


भिवंडीच्या जागेवरुन मविआच्या तिन्ही पक्षात रस्सीखेच होती. खासकरुन शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये. ऐनवेळी पवारांनी बाजी मारली. न तुला न मला थेट पवारांना अशी आवस्था झाली. या जागेवर राष्ट्रवादी कोणता उमेदवार देणार? यावर सस्पेन्स होता. निष्ठावंतांची मोठी यादी त्यांच्याकडे होती. मात्र पक्षांतरात पटाईत असलेल्या सुरेक्ष म्हात्रेंना त्यांनी उमेदवारी दिली. काँग्रेस, मनसे, शिवसेना, भाजप, आणि आता राष्ट्रवादी असं त्यांच्या राजकीय प्रवास आहे. २०१४ ला सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मनसेकडून निवडणूक लढवली. पुढं २०१९ ला ते शिवसेनेत होते. कपिल पाटील यांना विरोध केल्यामुळे त्यांचे पक्षात निलंबन करण्यात आलं. २०२१ ला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भिवंडीची जागा काँग्रेसकडे होती. ती राष्ट्रवादीने मागून घेतली. तिथं सुरेश म्हात्रेंना तिकीट दिलंय. त्यामुळं निष्ठावंतांची नाराजी तिथं मोठा फॅक्टर ठरु शकते.

Post a Comment

Previous Post Next Post