विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांना अजित पवार म्हणाले, 'चुकीला माफी नाही !

मुंबई :  अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे नेते आणि  माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, भाजपने शिवसेनेला फसवलं अशी स्पष्ट कबुली दिली आणि  ही चूक भविष्यात सुधारू, अशी पुष्टी जोडली, एखादा जोतिरादित्य सिंधीया आमच्याकडे पुढील काळात येईल अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,  'दगडी चाळ' चित्रपटातील 'चुकीला माफी नाही' हा डायलॉग मारला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची तीन महिन्यांची मैत्री असेल, पण आमची मैत्री 30 वर्षांपासूनची जुनी आाहे. यावर सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडून म्हणून फसवलं, अशी टिप्पणी आली असता होय, आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली, पण आमच्या चुकीचा तुम्ही फायदा घेतला, असा टोमणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना मारतानाच ती चूक एक दिवस आम्ही सुधारू, असे सुधीर मुनगंटीवार  म्हणाले होते.

यावर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना चित्रपटाचा डायलॉग म्हणत उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले की, "सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली. पण आता चुकीला माफी नाही." हे वक्तव्य करताना अजित पवार यांनी बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कटाक्ष टाकला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही मानेने नकार देत चुकीला माफी नसल्याचं सूचित केलं. तसंच "आपलं सरकार होणार आहे, होणार आहे, असंच तुम्हाला पाच वर्ष म्हणावं लागेल. इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तिकडे (भाजप) होणार नाही याची काळजी घ्या.

अजित पवार उत्तर देत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी थेट त्यांच्या पहाटेच्या शपथविधी आठवण करुन दिली. या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यानंतर अजित पवारही आक्रमक झाले. "मी शपथ घेतली मान्य करतो. मी काही लपून करत नाही, तिथे गेलो, ते सोडून इथे आलो आणि आता मी इथे मजबूत बसलोय," असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post