प्लास्टिकबंदी असूनही तब्बल 1028 किलो प्लास्टिक जप्त

मुंबईतून 3 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल 

मुंबईसह राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. तरीही सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने पावणे दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली कारवाई पुन्हा एकदा धडाक्याने सुरु करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत पालिकेने 4081 आस्थापनांना भेटी दिल्या. यामध्ये 1028 किलो प्लास्टिक जप्त केले. तर 3 लाख 75 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सर्वाधिक प्लास्टिकचा साठा मशिद बंदर येथे आढळला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्यात 1 मार्च पासून प्लास्टिकवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. 1 मार्च पासून ही कारवाई हाती घेतली आहे.  या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मे 2020 पर्यंत प्लास्टिकमुक्त मुंबई करण्याचा निर्धार केला आहे. येत्या मे 2020 पर्यंत प्लास्टिकमुक्त करण्याच्यादृष्टीने पालिका कामाला लागली आहे.

महापालिकेने मंडईतील गाळेधारक, फेरीवाले आणि दुकानांसह मंगल कार्यालय, उपहारगृह, कार्यालयांमध्येही तपासणी केली जाते आहे. प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास कडक कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील नागरिक, व्यापारी, फेरीवाले यासह सर्वांनी बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

रविवारपासून पालिकेने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु केला आहे. मुंबईतील सर्व वॉर्डातील 4081 आस्थापनांना संबंधित अधिका-यांनी भेटी दिल्या. या भेटीमध्ये 1028.097 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 3 लाख 75 हजार रुपयाचा दंड वसूल केला. एका दुकानदारांने दंड देण्यास नकार दिल्याने संबंधित दुकानदारावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. दुकाने व फेरीवाल्यांकडे प्लास्टिक जप्त करण्यात आले असून सर्वाधिक प्लास्टिकचा साठा मशिद बंदर येथे आढळल्याची माहिती संबंधित अधिका-याने दिली.

बंदी घालण्यात आलेले प्लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसर्‍या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) वर बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या), प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या व एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप्स्, प्लेटस, ग्लास, चमचे इत्यादी, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिकचे वेष्टण यांच्या वापरावर बंदी घातलेली आहे.


प्लास्टिक बंदी मुंबईसह राज्यात लागू झाल्यानंतर मुंबईत प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोलवर कारवाई करण्यासाठी जून, 2018 मध्ये ब्ल्यू स्क्वॉडची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी महानगरपालिकेच्या बाजार, अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खात्यातील एकूण 310 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. या पथकाच्या माध्यमातून तत्कालिन उपायुक्त विशेष निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई हाती घेतली होती. निधी चौधरी यांची बदली झाल्यानंतर, ही कारवाई थंड पडली. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी कारवाई तीव्र करण्याचे निर्देश सर्व महापालिकांना देत मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र प्रतिबंधित प्लास्टिक मुक्त करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिकेच्या विशेष पथकाने कारवाईचा धडाका सुरु केला आहे.

आतापर्यंत साडेचार कोटींचा दंड वसूल
जून 2018 पासून आजपर्यंत मुंबईतील आतापर्यंत 16 लाख 4405 आस्थापनांना भेटी दिल्या असून 95 हजार किलोग्रॅमहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. 669 आस्थापनांना तपासणी अहवाल दिले आहेत. तर 4 कोटी 67 लाख 95 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post