बीड जिल्ह्यात आता रिव्हॉल्व्हरबाजीला सुट्टी आणि दादागिरीला रामराम!



बीड जिल्ह्यात राजकारण आणि गुन्हेगारी यांचे नेहमीच छान सूर जुळले होते, पण आता ते सूर बेसूर होणार, कारण पालकमंत्रीपदावर "दादा" म्हणजेच अजित पवार आलेत! पहिल्याच दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना कडक दम भरत, गुन्हेगारांना “मकोका”चा डोस देण्याची तयारी जाहीर केली.

"मी जवळचा आहे, पण चुकीचं वागू नका!"

दादांचा पहिला इशारा कार्यकर्त्यांना – “मी तुमचा आहे म्हणून मनात काही चाळे आणू नका, नाहीतर...!” आता हा "नाहीतर" काय ते सगळ्यांना कळलंच असेल!

रिव्हॉल्व्हरबाजीला रामराम!

सोशल मीडियावर काही जण कमरेला रिव्हॉल्व्हर लावून माज दाखवत फिरतात, पण दादांनी जाहीरच केलं – “असं कराल तर लायसन्सचा स्टँप काढून घेईन!” आता काही मंडळी मोबाईलमध्ये जुने फोटो जपून ठेवतील, कारण पुढे अशी स्टाईल दाखवायला मिळेल का, शंका आहे!

अधिकारी मंडळी, तयारीत राहा!

बीडमध्ये काही अधिकारी बऱ्याच काळापासून मुळं रोवून बसले आहेत. पण दादा आलेत, म्हणजे आता कुंडीतली झाडं हलणार! “चांगले अधिकारीच हवे!” असं ठणकावून सांगत त्यांनी काहींची झोप उडवली. आता टेबलाखालून फाईल फिरवणाऱ्यांचे हात गार पडले असतील!

"हे नव्याचे नऊ दिवस समजू नका!"

अखेर दादांनी स्पष्ट सांगितलं – “मी कोणावर अन्याय करणार नाही, पण गुन्हेगारीला माफी नाही!” म्हणजे गुन्हेगारांनी आता मंदिरात दर्शनाला जायची तयारी करावी!

बीडमध्ये आता दादांचा धडाका सुरू झालाय. काहींना धडकी भरली असेल, काही जण “हिच वेळ” म्हणून शहाणपणाने वागत असतील, पण एक मात्र खरं – बीड जिल्ह्यात आता रिव्हॉल्व्हरबाजीला सुट्टी आणि दादागिरीला रामराम!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने