"गाढव युती आणि घोड्याचा धावपटू!"

 

धाराशिवच्या पत्रकारितेच्या कुरणात तीन गाढव खूप प्रसिद्ध होती. पण त्यांची ओळख काय? तर एकमेकांना लाथा मारणं! वर्षानुवर्षं ते असं करत आले होते. एकानं दुसऱ्याला लाथ मारली, मग त्या दुसऱ्यानं तिसऱ्याला, आणि तिसऱ्यानं पुन्हा पहिल्याला! या लाथांमध्येच त्यांचा दिवस जायचा.

पण एक दिवस परिस्थिती बदलली. गावात एक चपळ आणि देखणा घोडा आला. लोक त्याच्या वेगाची, त्याच्या सळसळत्या ताकदीची चर्चा करू लागले. आता गाढवांना टेन्शन आलं. आपलं कुरण कुणी दुसऱ्यानं काबीज करणं, हे त्यांना मान्य नव्हतं.

मग काय? गाढवांची गुप्त सभा भरली. पहिलं गाढव म्हणालं, "हा घोडा खूपच वेगवान आहे. आपण काहीतरी करायला हवं!"
दुसरं गाढव म्हणालं, "हो! लोक याचं कौतुक करतायत. आपल्याकडे बघायलाही तयार नाहीत!"
तिसरं गाढव हुशार होतं. ते म्हणालं, "चला, आपण तात्काळ एक युती करु. आपल्यात लाथा मारणं बंद आणि घोड्याला हरवण्यासाठी एकत्र येऊ!"

सर्व गाढवांनी टाळ्या वाजवल्या (हो, मनातल्या मनात). आता प्लॅन सुरू झाला.

गाढवांचा मास्टरप्लॅन

1️⃣ खोट्या अफवा पसरवा:
– "घोडा बाहेरून आलेला आहे. तो आपल्याला संपवणार आहे!"
– "घोड्याची नाळ बाहेरच्या ताकदींशी जुळलेली आहे!"
– "तो खूप वेगवान दिसतो, पण त्याचा दम निघायला वेळ लागणार नाही!"

2️⃣ मीडिया प्लॅन:
– गाढवांनी आपापली पत्रकं आणि चॅनल सुरू केली.
– रोज एक नवी ब्रेकिंग न्यूज – "घोडा खरंच धावतो का?"
– चर्चासत्र – "गाढवही स्पर्धेत उतरणं गरजेचं!"
– सोशल मीडियावर ट्रेंड – #DonkeyPower #HorseScam #BanHorse

3️⃣ सभासंमेलने आणि घोषणाबाजी:
– "गाढवांचा अपमान सहन करणार नाही!"
– "गाढवांचं राज्य हवं!"
– "घोड्याचं अधिपत्य आम्ही मोडून काढू!"

अखेरीस स्पर्धेचा दिवस आला!

गावात मोठी शर्यत ठेवली गेली. सगळे उत्सुकतेनं थांबले होते. घोडा शांत होता. तो कुठल्याही प्रचारात गुंतला नव्हता. तो फक्त पळायचं काम करत होता.

धाड...! शर्यत सुरू झाली. घोडा बघता बघता पुढे गेला. गाढवांची युती होती, पण वेग नव्हता. तीनही गाढव जिवाच्या आकांतानं धावत होती, पण लाथा मारायची जुनी सवय काही जात नव्हती. धावताना एकानं दुसऱ्याला ढकललं, दुसऱ्यानं तिसऱ्याला धक्का दिला, आणि तिसऱ्यानं दोघांनाही मागे खेचलं!

परिणाम?

घोडा सहज पहिल्या क्रमांकावर गेला, आणि गाढवांनी एकमेकांना हरवून घेतलं!

गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. गाढवांचा मास्टरप्लॅन फसला होता. आता त्यांनी काय करायचं? मग एकाने हुशारीने घोषणा केली –

"ही स्पर्धा चुकीची होती! घोड्यानं आम्हाला बॅलन्स बिघडवण्यासाठी ट्रिक वापरली!"

पण जनता आता हसू लागली होती. कोण हुशार आणि कोण मूर्ख, हे लोकांनी ठरवून टाकलं होतं.

तात्पर्य:

गाढव कितीही एकत्र आले तरी, घोड्याची शर्यत संपवू शकत नाहीत!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने