बीड – भाजप कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याचे घर वन विभागाच्या जागेवर अनधिकृतरित्या उभारण्यात आल्याने वन विभागाच्या वतीने त्यावर बुलडोझर चालवण्यात आले. या कारवाईपूर्वी घरातील सर्व सामान बाहेर काढण्यात आले होते. शिरूर कासार शहराजवळील वन विभागाच्या जागेवर हे घर बांधण्यात आले होते, त्यामुळे वन विभागाने कायदेशीर कारवाई करत हे घर जमीनदोस्त केले. या कारवाईदरम्यान वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतीश भोसले उर्फ खोक्या याचे नाव मागील काही दिवसांपासून चर्चेत होते. ढाकणे पिता-पुत्राला मारहाण आणि पैशांची उधळण करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. मागील २० दिवसांत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी काल प्रयागराज येथून त्याला अटक केली असली, तरी तो बीडमध्ये पोहोचण्याआधीच वन विभागाने त्याच्या घरावर कारवाई करत त्याला मोठा धक्का दिला.
काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेच्या घराची तपासणी केली होती. या तपासणीत शिकारीसाठी लागणारे साहित्य आणि प्राण्यांचे मांस सापडल्याने त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच वन विभागाच्या जागेवर घर बांधल्याने दुसरा गुन्हा शिरूर कासार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. वन विभागाने त्याला घरासंदर्भात नोटीसही बजावली होती. मात्र, ४८ तास उलटूनही त्याने उत्तर न दिल्याने अखेर वन विभागाने कठोर पावले उचलत त्याच्या घरावर बुलडोझर फिरवला.
टिप्पणी पोस्ट करा