विटभट्टी मालक व त्याच्या साथीदारांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात अपहरण व वेठबिगारीचा गुन्हा दाखल
नाशिक- राज्यात मोठ्या प्रमाणात विटभट्टी, दगड खाणी मालक, द्राक्ष बागायतदार, ऊस उत्पादक व तत्सम मालक वर्गाकडून वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] सर्रास पायमल्ली होत आहे. त्यामुळे आदिवासी मजूर अजूनही वेठबिगारीच्या विळख्यात अडकले आहेत. नाशिक मधील इगतपुरी तालुक्यातल्या डहाळेवाडी येथे प्रकाश गोडे या मजुराला विटभट्टी मालकाने बेदम मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून त्याला चारचाकी गाडीतून पळवून नेल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अपहरण व वेठबिगारीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोपी विटभट्टी मालकाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी करून आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी सुनीता प्रकाश गोडे या पीडित मजुराच्या पत्नीने मालक अमोल भोसले व दोन अज्ञातां विरोधात नवऱ्याला अपहरण केल्याची घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, "विटभट्टीवर काम करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर तालुक्यातील शिरगाव येथील विटभट्टी मालक अमोल भोसले यांच्याकडून मी विटभट्टीवर विटा वाहण्यासाठी १२ हजार व माझा पती प्रकाश गोडे विटा थापण्यासाठी यांनी २० हजार रुपयांची उचल घेतली होती. सदरची रक्कम विटभट्टीवर काम करून फेडण्याचे ठरले होते व दिवाळी सणानंतर कामावर जायचे ठरले होते. परंतु दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमोल भोसले व त्यांच्या दोन साथीदारांनी डहाळेवाडी येथील फिर्यादीच्या घरात घुसून प्रकाश गोडे यांना मारहाण करीत हात-पाय बांधून त्यांना चारचाकी वाहनातून जबरदस्तीने घेऊन गेले" असे तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अमोल भोसले व त्याच्या दोन साथीदार विरोधात भादंवि कलम ३६३, ४५२, ३७४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विटभट्टी मालक वेठबिगारी करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रमजीवी संघटनेने वर्षभरात पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील २६ वेठबिगारांना मुक्त केले आहे.
दरम्यान, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री. विवेक पंडित यांनी "समाजातील ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] ची कठोर अंमलबजावणी करावी. त्यासाठी राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच मुक्त करण्यात आलेल्या वेठबिगारांना 'तात्काळ सहाय्य' आणि 'दीर्घकालीन पुनर्वसन' करण्यात यावे" अशी मागणी केली आहे.
सदर घटनेचा अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवडे कीरत आहे. दरम्यान आरोपी अमोल भोसले याला अटक करण्यात आली. काल दिनांक २२ रोजी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती व आज पुन्हा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपीची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
समाजातील ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी शासनाने वेठबिगारी विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी - विवेक पंडित
टिप्पणी पोस्ट करा