कोरोनामुळे येरमाळ्याची येडेश्वरी यात्रा रद्द

उस्मानाबाद :  जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका येरमाळ्याच्या  येडेश्वरी देवीच्या  चैत्र पौर्णिमा यात्रेलाही बसला आहे. उस्मानाबादचा  हजरत शमशोद्दीन गाजी ऊरुस केवळ कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता, त्यानंतर  कोरोनाच्या धसक्याने येरमाळ्याची येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली  आहे. 

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन, मंदिर प्रशासन, पुजारी आणि गावकरी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तुळजापूरच्या तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीला मान आहे. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन भाविक या यात्रेला हजेरी लावतात. यात्रेसाठी 10 ते 15 लाख भाविक हजेरी लावतात. येडेश्वरी देवीचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे. देवीची पालखी डोंगरावरच राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. या काळात धार्मिक विधी लाईव्ह दाखवणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं आहे. भाविकांनी चुना वेचण्यासाठी येऊ नये असे आवाहन प्रशासन, ग्रामपंचायत, मंदिर संस्थानाकडून करण्यात आले आहे.  

येरमाळा येथील महाराष्ट्राचे प्रसिद्ध आराध्यदैवत श्री येडेश्वरी देवीची अवघ्या महिन्याभरावर आलेली चैत्र पौर्णिमा यात्रा दि. ९ ते २३ एप्रिल दरम्यान भरणार होती. परंतु, ही यात्रा सध्या धोकादायक बनलेल्या कोरोना विषाणूमुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येरमाळा येथील विठ्ठल-रुक्माई मंदिर आनंद धाम येथे बुधवारी झालेल्या प्रशासकीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात यात्रा काळात होणाऱ्या सर्व धर्मिक विधीसह यात्रेतील मुख्य चुनखडी वेचण्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. ही बैठक उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

येथील येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमेला मोठी यात्रा भरते. यानिमित्ताने श्री येडेश्वरीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातुनही भाविक लाखोंच्या संख्येने येतात.यात्रेतील मुख्य दिवस हा चुनखडी वेचण्याचा असतो. चुनखडी वेचण्यासाठी जवळ जवळ दहा ते बारा लाख भावीक येरमाळ्यात गर्दी करतात. परंतु, कोरोणा विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन प्रशासनाने बैठक घेऊन या वर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कळंब तहसीलदार मंजुषा लटपटे, सरपंच विकास बारकुल, वैद्यकीय अधिकारी सुधाकर बिराजदार, सपोनि पंडित सोनवणे यांच्यासह ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्टचे सदस्य, मानकरी ग्रामस्थ उपस्थित होते. चर्चेतुन गावकरी, मानकरी ग्रामस्थ यांच्यात झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला.

या शिवाय यात्रेत दाखल होणाऱ्या व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणारे व्यवसाय परवानेही देण्यात येणार नाहीत.तसेच खबरदारीचा उपाय म्हणुन गावात विविध आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचा संवसर्ग होऊ नये म्हणुन दर २ ते ८ दिवसाला निर्जंतुकीकरनासाठी फवारण्या करण्याचे आदेशही आरोग्य विभागाला उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने