महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण पुण्यात सापडला

पुणे : जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना व्हायरसने आता  महाराष्ट्रात चंचुप्रवेश केला आहे. राज्यात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण पुण्यात सापडला असून, त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 


पुण्यातील  एक जोडपे  1 मार्च रोजी दुबईवरुन पुण्यात आले.  हे दोघे  एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते.  मात्र एक तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती.  त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले.  मात्र आज त्यांना त्रास होऊ लागल्याने हे पती पत्नी तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू  हॉस्पिटलमधे पोहचले.  त्यानंतर त्यांची सॅंपल्स टेस्टिंगसाठी एन आय व्ही कडे पाठवण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आढळली. हे दोघे पती पत्नी दुबई वरुन आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती आणि दुबईमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं तोपर्यंत  दिसून आलेलं नव्हतं.  त्यामुळे या दोघांबरोरच ते ज्या चाळीस जणांबरोबर दुबईला गेले होते त्यापैकी कोणाच्याच टेस्ट करण्यात आल्या नाहीत असं स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलंय.
मात्र आता हे पती पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने ते ज्यांच्यासोबत दुबईला गेले होते त्या 40 जणांच्याही टेस्ट कराव्या लागणार आहेत.  त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले हे दोन पती -  पत्नी मागील आठ दिवसांमध्ये ज्यांच्या संपर्कात आले असतील अशा सर्वांचा शोध घ्यावा लागणार असल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. 
कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण सोमवारी पुण्यात आढळून आले आहेत. दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहेत. एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा, अशी सतर्कता बाळगावी, असं आवाहनही आरोग्यमंत्री यांनी केले आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post