एकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार...

मुंबई - राजकीय विजनवासात गेलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची  राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.  भाजपच्या राज्य कार्यकारणीकडून एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा आग्रह आहे. मात्र दिल्ली वर्तुळात एकनाथ खडसे यांच्या नावाला मान्यता मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे.
महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. त्या जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. भाजपचं विधानसभेतील संख्याबळ पाहता त्यांच्या वाट्याला यापैकी 3 जागा येत आहेत. यापूर्वी रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता पक्षश्रेष्ठी एकनाथ खडसेंबाबत विचार करत असल्याचं समोर येत आहे.
राज्यसभेचे राज्यातील सात सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार, रामदास आठवले यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार यात शंका नाही. तर राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांचं नाव देखील निश्चित मानलं जात आहे. तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना यावेळी राज्यसभेवर संधी मिळणार का याचीही उत्सुकता आहे.

येत्या 6 मार्चला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. 13 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर 26 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान मतदान पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post