नातू हवा म्हणून सूनेचा छळ , राष्ट्रवादी महिला आमदाराविरुद्ध गुन्हा ...

मुंबई -   मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे  पती अभिजीत, त्यांचा मुलगा अजित (पीडितेचा नवरा), आनंद (पीडितेचा मेहुणा) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून विद्या चव्हाणांसह कुटुंबीय सुनेचा छळ करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. पीडितेला पहिली मुलगी आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा मुलगीच झाल्यानंच विद्या चव्हाण कुटुंबीय पीडितेचा छळ करत होते. पीडित मुलीने विद्या चव्हाण यांच्या घरी ठेवलेल्या तिच्या मौल्यवान वस्तूंचीही मागणी केली आहे. विशेष म्हणजे महिलांवर अन्याय झाल्यावर तत्परतेने पुढे येणाऱ्या विद्या चव्हाण याच सुनेचा छळ करत असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

विद्या चव्हाण यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सूनेने छळाची तक्रार दिली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरी मुलगी झाल्याने चव्हाण कुटुंब पीडितेचा छळ करत होतं. पीडितेला आधीची मुलगी होती. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मुदतीआधीच प्रसूती होऊन हे बाळ दगावलं. याप्रकारानंतर घरच्यांकडून माझा अधिकच छळ होऊ लागला, असे पीडितेने तक्रारीत नमूद केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांचाही जबाब नोंदवून घेतला आहे. तर दुसरीकडे विद्या चव्हाण यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने