पत्रकारिता म्हणजे काय? समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी, सत्याला वाचा फोडणारी आणि जनतेच्या मनातील प्रश्नांना उजेडात आणणारी कला! पण आजकालच्या पत्रकारितेत सत्य कुठे हरवले आहे? काय होतंय या पवित्र क्षेत्राचं?
प्र. के. अत्रे आणि ना.सी. फडके यांच्या काळापासूनच वादाचा वणवा पेटला होता. एकदा फडके यांनी अत्रे विरुद्ध लिहिताना, "अत्रे नव्हे कुत्रे" असा शब्दप्रयोग केला. अत्रेही कुठे मागे राहणारे? त्यांनीही "फडकेच फडकं" असं प्रत्युत्तर दिलं. हा वाद त्या काळात मनोरंजन वाटत असेल, पण आजचा वाद? आजच्या वादाचा रोख समाजसेवेकडे नसून स्वार्थसेवेकडे वळला आहे.
आजचा प्रश्न असा आहे की, पत्रकारिता वादाच्या कुंडीत का अडकली आहे? चुकीच्या गोष्टींवर टीका करणे हे कर्तव्य आहेच, पण आजकाल पत्रकार हे कर्तव्य विसरून षड्यंत्राच्या जाळ्यात अडकले आहेत. ब्लॅकमेलिंगच्या मार्गावरून चालत, चांगल्या पत्रकारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे पत्रकार वाढले आहेत. चांगल्यांचे नाव खराब करण्यासाठी काही लोक अन्नात विष मिसळण्याचा प्रकार करत आहेत.
तुम्हाला कोणी टोकले म्हणून लगेच शत्रू मानून त्यांच्यावर चिखलफेक करणे हे कुठल्या पत्रकारितेचे लक्षण आहे? टीका करा, नक्कीच करा, पण ती सत्याधिष्ठित असावी. काहींना टोचणाऱ्या लेखांमुळे कोणावर व्यक्तिगत हल्ला करण्याचा अधिकार कोणी दिला? सत्याला धरून लिहिणे आणि ब्लॅकमेलिंगच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
आपल्याच क्षेत्रातील सहकार्यांविरुद्ध षड्यंत्र करण्याऐवजी, आपण स्वतःकडे पाहिले पाहिजे. मी कोण आहे? मी का लिहितो? माझ्या लेखणीतून सत्य बाहेर येते का? की केवळ वैयक्तिक सूडभावनेचा विखार? आपली लेखणी न्यायासाठी लढते का नुसताच हिणकस आरोप करते?
शालजोडीतून लेखन करा, पण ते सत्यावर आधारलेले असावे. समाजाला दिशा दाखविण्यासाठी लेखणी वापरा, अपप्रचारासाठी नव्हे. तुमच्या लेखणीचा वार वाईट प्रवृत्तींवर असला पाहिजे, चांगल्या व्यक्तींवर नव्हे. चांगल्या पत्रकारांना चिखलात ओढण्याऐवजी वाईट पत्रकारांवर लेखणीने प्रहार करा.
आत्मपरीक्षणाची गरज आहे! पत्रकारितेला पुन्हा एकदा त्या पवित्रतेकडे नेऊ, जिथे सत्याचा विजय होतो आणि खोटेपणाचे बुरखे फाटतात. सत्यासाठी झगडूया, पण त्यासाठी सत्याचीच कास धरूया!
- बोरूबहाद्दर
टिप्पणी पोस्ट करा