मुख्यमंत्र्यांना घर सुटेना ! ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय ?

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे उद्धव  ठाकरे यांच्यावर टीकास्त्र 



पैठण : आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं  घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी.  आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झालं नाही. ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 


गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मंत्री दानवे आज पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं  घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी.  आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झालं नाही. ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय, अशा शब्दात दानवेंनी टीका केली आहे. ते म्हणाले, या स्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  महाराष्ट्रात फिरले. मागच्या वर्षीही ते बांधावर गेले. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांत गेला पाहिजे. ही आपली माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, असं दानवे म्हणाले. आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा. आता लोक मोबाईल उघडून पाहातो आणि खिशात ठेवतो, असंही दानवे म्हणाले.


आमच्या सरकारनं शेतकरी, गोरगरीबांना अनेक योजना दिल्या. या राज्य सरकारनं काय दिलं? असा सवाल त्यांनी केला. हे सरकार कोण चालवतंय काही कळत नाही. तिघांची तोंड तीन दिशेला असलेलं हे सरकार आहे. यांच्या काळात या राज्याचं काय होईल काही सांगता येत नाही, असं दानवे म्हणाले. हे सरकार कोण चालवतंय, कोण निर्णय घेतंय काय कळतच नाही, असं ते म्हणाले.


मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसतोय. या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्यापासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तर आज सकाळी सात वाजल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती व इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत आहेत  मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घर सुटत नसल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post