डॉलर कमकुवत झाल्याने सोने व बेस मेटलचे दर वाढलेमुंबई, २१ सप्टेंबर २०२०: मागील आठवड्यात, अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने स्पॉट गोल्ड आणि बेस मेटलच्या किंमतींना आधार मिळाला. तसेच आर्थिक सुधारणांच्या चिंतेमुळेही सोन्याचे भाव वाढले. तथापि, गुंतवणुकदारांनी औद्योगिक धातूंबाबत सावधगिरी बाळगली. अमेरिकी क्रूडसाठ्यात घट झाल्याने तसेच ओपेक+ देशांनी उत्पादन कपातीची कठोर अंमलबजावणी केल्याने कच्च्या तेलाचे भावही वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: साथीचे वाढते प्रमाण आणि अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.४२% नी वाढले. रिटेल विक्रीतील घसरण, ग्राहकांच्या खर्चातील मंदी आणि कमकुवत कामगार मार्केट अशी स्थिती असूनही अमेरिकी फेडरलने पुढील काही महिन्यांत आर्थिक सुधारणा वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याच्या दर वाढीला मर्यादा आल्या. व्याज दर कमी ठेवणे आणि अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आणखी प्रोत्साहन देण्याच्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे सोन्याच्या किंमतीतील नफ्याला मर्यादा आल्या.


कच्चे तेल: अमरिकी क्रूडच्या साठ्यात घसरण आणि ओपेक+ देशांनी उत्पादन कपातीवर कठोर अंमलबाजवणी केल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत ७.८ टक्क्यांनी वाढ झाली. ओपेक आणि सदस्यांनी म्हटले की, नियोजित कपातीचे पालन न करणाऱ्या देशांना येत्या काही महिन्यांत नुकसान भरपाई म्हणून उत्पादन कमी करावे लागेल. कच्च्या तेलाची बाजारपेठ कमकुवतच रहिल्यास ओपेक+ ने ऑक्टोबर २०२० मध्ये आणखी एका बैठकीचे आयोजन केले आहे. यामुळे तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. १.३ दशलक्ष बॅरल अशी रॉयटर्सची अपेक्षा असताना अमेरिकी क्रूडसाठ्यात ४.४ दशलक्ष बॅरलने घट झाली आहे, अशी माहिती ऊर्जा माहिती प्रशासनाने दिली.


बेस मेटल्स: मागील आठवड्यात चीनकडून वाढती मागणी आणि कमकुवत अमेरिकी डॉलर यामुळे एलएमईवरील बेस मेटलचे दर उच्चांकावर स्थिरावले. तथापि, जागतिक आर्थिक सुधारणेची चिंता आणि अमेरिका-चीनदरम्यान वाढता तणाव यामुळे नफ्यावर मर्यादा आल्या. आर्थिक सुधारणांसाठी चीनमधील बँकांनी नव्याने कर्ज मंजूर करण्याचे प्रमाण वाढवले. त्यामुळे औद्योगिक धातूंचा दृष्टीकोन सुधारला. पिपल्स बँक ऑफ चायनाच्या मते, ऑगस्ट २०२० मध्ये नवे कर्ज १.२८ ट्रिलियन युआनने वाढवले. जुलै २०२०पेक्षा ते २९% नी जास्त आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने