पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५

पुणे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकट सहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. 

दरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले आहेत. 

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत. 

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२  बेडस् उपलब्ध आहेत. 


केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर  मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणाऱ्या १२ देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post