राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून एक कोटींचा निधी

अयोध्या  अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, शिवसेना भाजपपासून दूर गेली मात्र हिंदुत्त्वापासून दूर गेलेली नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.
  
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेले आहेत. प्रभू रामाचं दर्शन घेण्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांशी सवांद साधला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “राम मंदिर होईल की नाही… ते कोण बनवेल… याबाबत आधी चर्चा सुरु होती. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की केंद्र सरकारने राम मंदिराच्या निर्मितीसाठी कायदा बनवावा, तो कायदा तर झाला नाही. मात्र, आता हा प्रश्न सुटला आहे. २०१८ मध्ये मी पहिल्यांदा इथं आलो होतो, त्यानंतर मी पुन्हा इथं येईल असं म्हटलं होतं. त्यामुळे आज पुन्हा अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”

राममंदिर निर्माणासाठी सरकारने 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' नावाची ट्रस्ट स्थापन केली आहे. बाळासाहेब होते तेव्हापासून महाराष्ट्रातून राम मंदिराच्या निर्माणासाठी शिळा पाठवल्या जात आहेत. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की महाराष्ट्रातून जे रामभक्त प्रभूरामाच्या दर्शनासाठी याठिकाणी येतील, त्यांच्या राहण्याच्या सोईसाठी जमीन द्यावी. आम्ही त्यावर महाराष्ट्र भवन बांधू, अशी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“मला स्वप्नातही वाटलं नव्हत की मी मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी त्यांनी सांगितला. कालच मला कळालं की ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. त्यामुळे शिवसेना ट्रस्टच्यावतीनं १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्विकार करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने