बुलडाण्यात दोन बाल गुन्हेगार मुलांची सुधारगृहात आत्महत्या



बुलडाणा - शहरातील चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात दोन बाल गुन्हेगार मुलांनी बंद खोलीत गळफास घेतल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.मंगेश लक्ष्मण डाबेराव (15), गजानन शंकर पांगरे ( 17 , रा. शेगाव) अशी या मुलांची नावे आहेत.या मुलांनी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समजले नाही. 


 चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात बालगृहात एकूण आठ जण होते. पैकी मृतदेह आढळलेल्या खोलीत 3 मुले होती. एक जण सुखरूप आहे. आत्महत्या करण्यात आलेली दोन मुले पंधरा दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून पळून गेली होती. त्यांना पुन्हा पकडून आणण्यात आले होते. दोघांची आत्महत्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, दोघांनी संगनमताने आत्महत्या केल्याचे त्यातून दिसून येत आहे. आत्महत्येसाठी एकमेकांना त्यांनी मदत केल्याचे त्यात दिसून येत आहे. 


दोन्ही मुले बालगुन्हेगार होती. त्यांना शेगाव पोलिसांनी एका लग्नात चोरी करताना पकडले होते, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला असून पंचनामा व तपास सुरू आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे अधीक्षक . महाजन हेही घटनास्थळी पोहोचले आहेत. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने