डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर अज्ञातांकडून तोडफोड

आरोपींना अटक करण्याची सर्व स्तरातून मागणी



मुंबई - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर  दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसंच घरातील कुंड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून सदर प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. आरोपींची तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागमी सर्व स्तरातून होत आहे.


मुंबईतील दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात.


पोलिसांना आंबेडकर कुटुंबीयांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. आरोपींचा शोध तातडीने घ्यावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी केली आहे.
  दरम्यान, “राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

पोलिसांनी तत्परतेने तपास सुरु केला असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे  तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. याबाबत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post